पलूस तालुका काँग्रेसचे सरचिटणीस अरुण सावंत म्हणाले, संतगावपासून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र सात ते आठ किलोमीटर दूर आहे. गावातून वाहतुकीची अन्य कोणतीही व्यवस्था नाही. गावातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे म्हणून आम्ही सामाजिक कार्य म्हणून चारचाकी वाहनातून लोकांना लसीकरणासाठी भिलवडी येथे पाठवित होतो. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवून ठेवले. शेतकरी व मजूर कुटुंबातील वृद्ध ग्रामस्थ, महिला बसशिवाय गावातून बाहेर जाणे शक्य नव्हते. गावात सकाळी व सायंकाळी एकदाच बस येते. तीही सध्या बंद आहे. सर्वांकडेच दुचाकीची व्यवस्था नाही. यामुळे आम्ही स्वखर्चाने लोक पाठवित होतो. पोलिसांना विनंती केल्यानंतरही त्यांनी ऐकून घेतले नाही. वरिष्ठांशी बोलण्यास नकार दिला. प्रशासनाने एकतर गावात लसीकरणाची सोय करायला हवी होती. मात्र, तसे न करता स्वतः लसीकरणासाठी येत असतानाही त्यात अडथळे निर्माण करण्यात आले. काही दुचाकीस्वारांनाही लायसन्स, आधारकार्ड पाहूनही विनाकारण अडवून ठेवले. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गाडीत केवळ चार नागरिक पाठविणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मजूर वर्ग गाडीभाडे देण्यास समर्थ नसताना सामाजिक कार्य म्हणून आम्ही पुढाकार घेतला हाेता. तरीही पोलिसांकडून नाहक त्रास देण्यात आला.
याबाबत भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग म्हणाले, जिल्हाधिकारी व शासनाच्या आदेशानुसार वाहनांमध्ये जादा लोक बसल्याचे आढळल्याने वाहने अडविण्यात आली. नागरिकांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, शासकीय आदेशाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. कोरोनाच्या काळात आम्ही कोणालाही सवलत देणार नाही. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामध्ये हयगय होणार नाही.