विटा : बांधकाम परवाना देण्यासाठी व्यावसायिकाकडून दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या विटा नगरपालिकेचा मुख्याधिकारी विनायक औंधकरला अखेर निलंबित करण्यात आले. ७ जून रोजी नगरविकास खात्याने याबाबतचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे शहरात स्वागत करण्यात आले असून नागरिकांनी पुन्हा एकदा फटाक्यांची आतषबाजी केली.शहरातील बांधकाम व्यावसायिकाकडे पाचमजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी औंधकरने अडीच लाखांची मागणी केली होती. याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बांधकाम व्यावसायिक आणि मुख्याधिकारी औंधकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अडीच लाखाऐवजी दोन लाखाची मागणी करण्यात आली होती.
१६ मे रोजी रोख दोन लाख रुपये घेताना विनायक औंधकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात सापळा लावून रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. औंधकरला १७ मेरोजी अटक करण्यात आली होती. २० मेपर्यंत ४ दिवस म्हणजे ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता तो पोलिस कोठडीत होता. नगरविकास खात्याने ७ जूनच्या आदेशात म्हटले आहे की, विनायक औधकर पोलिस कोठडीत स्थानबद्ध दिनांकापासून म्हणजे दि. १७ मे पासून निलंबित झाल्याचे मानण्यात आले आहे.दरम्यान, औंधकरची कराड, आळंदी आणि कोल्हापूर येथील कारकीर्द पूर्वीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे. यावेळी तर त्याने थेट मुख्याधिकाऱ्याच्या दालनातच लाच स्वीकारली. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात मुख्याधिकारी म्हणून सुरू झालेला औंधकरचा कार्यकाल संपुष्टात आला. नगरविकास विभागाने केलेल्या निलंबन कारवाईमुळे शहरात नागरिकांनी पुन्हा एकदा फटाक्यांची आतषबाजी केली.