लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना कालावधित लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बुधवारपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. शहरातील प्रमुख मार्गावर जादा पोलिसांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईबरोबरच कर्णकर्कश हॉर्न बसविलेले वाहनधारक, ट्रीपल सीट चालकांवरही कारवाई करण्यात आली. यात १३६ जणांवर कारवाई करत २४ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
बाजारपेठेसह रस्त्यावर वाढत चाललेल्या रहदारीमुळे विनामास्क फिरणारे, ट्रीपल सीट, परवाना न बाळगता फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेच्या सहा. पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी कारवाई सुरू केली आहे.
बुधवारी शंभरफुटी रोडवरील गारपीर चौकाजवळ पोलीस पथकाने वाहनांची तपासणी केली. याशिवाय कोल्हापूर रोड, बायपास रोडवरही कारवाई करण्यात आली. यात विनामास्क फिरणाऱ्या ६८ जणांवर कारवाई करत ७ हजार २००, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ६८ जणांवर कारवाई करत १६ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला. शहरातील विविध भागात ही मोहीम यापुढे चालूच राहणार असल्याचे सहा. निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी सांगितले.
----------------------------
फोटो नंबर ०२ शरद ०१ एडीटोरियलवर