तासगाव तहसील कार्यालयाच्या केंद्रावर सोमवारपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. पहिल्या दिवशी फक्त २०० डोस आले होते. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होत असल्याचे रविवारी प्रशासनाने जाहीर केले होते. आजपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना नोंदणी केलेले व न केलेले अशा दोन्ही गटाचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून १८ ते ४४ या वयोगटातील शेकडो नागरिकांनी रांगा लावल्या. नोंदणी केलेले आणि न केलेलेही रांगेत थांबले होते. मात्र, प्रशासनाने ज्यांची नोंदणी आहे, त्यांनाच लस देणार अशी भूमिका घेतल्याने पहाटेपासून रांगेत थांबलेले नागरिक संतप्त झाले. त्यांनी लसीकरण केंद्रावरच गोंधळ सुरू केला.
आजपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून लस दिली, मग आजच अगोदर ही सक्ती का, असा वाद उपस्थितांनी घातला. तर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनाच लस द्या, अशी भूमिका ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनी घेतली. त्यामुळे गोंधळ झाला.
अखेर तहसीलदार कल्पना ढवळे यांना बोलावण्यात आले. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्याच २०० लोकांना लस मिळेल, असे त्यांनी सांगितले. गोंधळ घातल्यास कारवाई करू, गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. पोलिसांनाही पाचारण केले. त्यानंतर ज्यांनी नोंदणीधारकांना लसीकरणाचे काम सुरू झाले.