लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खाशाबा जाधव सुवर्णपदकाचा बहुमान सांगलीच्या विराज जाधव याला मिळाला आहे. यंदाच्या वर्षातील तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.
मूळचा सांगलीचा विराज सध्या पुण्यातील बाबूराव घोलप महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतून पुरूष व महिला वर्गातून एका विद्यार्थ्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली जाते. २०१९-२० या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान विराजला मिळाला आहे. त्याला विद्यापीठाच्यावतीने खाशाबा जाधव सुवर्णपदक व रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
विराज याने राजस्थान येथे पार पडलेल्या आंतरविद्यापीठ कयाकिंग (नौकायन) स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभाग घेत दोन सुवर्णपदके, एक रौप्यपदक आणि कास्यपदक पटकावले आहे. आतापर्यंत विराजने १५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कास्यपदके पटकावली आहेत. त्याने पाच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असून दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निवड चाचणीत सहभाग घेतला होता.