चांदोलीत पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. चांदोली धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पर्यटन स्थळांबरोबरच धरणाच्या पायथ्याला निसर्गरम्य वातावरणात भोजन करण्याच्या उद्देशाने अनेक पर्यटक सहकुटुंब चांदोलीला येत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांच्या पार्ट्यांवर पोलिसांनी अंकुश ठेवून या पार्ट्या बंद केल्या आहेत. काही हुल्लडबाज पर्यटक शिविगाळ करणे, दारू पिऊन दंगामस्ती करणे, अश्लील हावभाव करणे, छेडछाड करणे असे प्रकार करू लागल्यामुळे चांदोलीच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे. अशा हुल्लडबाजांवर कारवाई करा अशी मागणी इतर पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थांतून झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजांवर कारवाई करण्याऐवजी येथील पर्यटकांच्या पार्ट्याच बंद केल्या आहेत. त्यामुळे लांबून येणारा तसेच कुटुंबासमवेत आलेला पर्यटक नाराज होऊन परत जात आहे.
चौकट-
पोलीस नेमा
शाहूवाडी तालुक्यातील उखळूजवळ असणाऱ्या पोलीस चौकीची नव्याने उभारणी करून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवावा. या ठिकाणी पर्यटकांची नोंद घेऊन नियम पाळण्याची सूचना करून मद्यपी तसेच हुल्लडबाजांवर कारवाई केल्यास सर्वांनाच येथील पर्यटनाचा आनंद लुटता येईल.
कोट
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक प्राणी पक्ष्यांची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात ते पहायला मिळत नाहीत. धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या वातावरणात भोजनावळीचा आनंद मिळत आहे. त्यामुळे आम्ही चांदोलीला भेट देतो. आता पोलिसांनी त्यावर बंधन घातल्याने चांदोलीला जायचे कशाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- विकास पाटील, पर्यटक सातारा
कोट
चांदोली धरण तसेच सह्याद्री व्याघ्रप्रकल्प पाहणाऱ्यांच्या संख्येपेक्षा धरणाच्या पायथ्याला पार्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करा. इतरांना पर्यटनाचा आनंद घेऊ द्या. पार्ट्या बंद करून येथील पर्यटन बंद करू नका.
- सुप्रिया शाहुराज पाटील, पर्यटक कोल्हापूर