फोटो - चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे गुरुवारी खुले करून पाणी सोडण्यात आले आहे. (छाया : गंगाराम पाटील )
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसरात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून धरणातून १४ हजार ९८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
चांदोली धरणात पाथरपुंजपासूनच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होत असते. पाणलोट क्षेत्रात धुवाॅंधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वक्राकार दरवाजा व वीजनिर्मिती केंद्राकडून १४,९८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा नदीकाठची पिके पाण्याखाली जाऊन नुकसान होणार आहे.
वारणा नदीला आलेल्या पुरामुळे दि. २२ ते २६ जुलै अशी पाच दिवस नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. ओढ्या-नाल्यांच्या पाण्याने जमिनी खचल्या, तर काही ठिकाणी गाळ व माती शेतात जाऊन पिके कुजली. त्याचे पंचनामे होतात न होतात तोवर पुन्हा पिके पाण्याखाली जाऊन उरलीसुरली पिकेही कुजण्याची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी आठ ते गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३१ मिलिमीटर व दिवसभराच्या आठ तासांत १२ मिलिमीटर पावसासह एकूण २,१३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६२४.३० मीटर झाली असून, धरणात ३१.३४ टीएमसी (९१.०९ टक्के) पाणीसाठा आहे.
290721\psx_20160124_081822.jpg
चांदोली तून विसर्ग वाढवला वक्राकार दरवाजे खुले करून असे पाणी बाहेर पडत आहे. (छाया गंगाराम पाटील )