सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्षच; काँग्रेसने एबी फॉर्म दिलाच नाही, बंडखोरी करणार?
By हणमंत पाटील | Published: April 20, 2024 12:34 PM2024-04-20T12:34:26+5:302024-04-20T12:36:07+5:30
शेवटच्या मिनिटापर्यंत कार्यकर्ते ताटकळत
हणमंत पाटील
सांगली : ‘माझे एकट्याचे नसून हे काँग्रेसचे बंड आहे,’ असे म्हणत इच्छुक विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. मात्र, अर्ज भरण्याच्या शुक्रवारी म्हणजे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात एबी फॉर्म मिळण्याची शेवटच्या मिनिटापर्यंत वाट पाहत होते. मात्र, काँग्रेसकडून एबी फाॅर्म न मिळाल्याने विशाल पाटील बंडखोरी कायम ठेवत अपक्ष लढणार का? याविषयी उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धवसेनेने सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्याला जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला. सांगली आमचा बालेकिल्ला असल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्याचा आग्रह प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी धरला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी हिरवा कंदील दाखविला जाईल, या आशेवर विशाल पाटील यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन्ही अर्ज चार दिवसांपूर्वी भरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी या आशेवर पाणी फिरले.
काँग्रेस नेत्यांची नाराजी कायम..
विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फाॅर्म शेवटच्या दिवशीही मिळाला नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांचे समर्थन करणारे काँग्रेसच्या नेतेमंडळींना महाविकास आघाडी धर्म पाळावा लागेल. तरीही चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरताना विश्वजित कदम यांनी अनुपस्थित राहून नाराजी दाखविली.