लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राजकीय साठमारीत अडकलेले वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील सध्या पुन्हा दि्वधावस्थेत आहेत. गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही ‘लोकसभा लढवायची की विधानसभा’, या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडलेले नाही. परिणामी ‘गहू तेव्हा पोळ्या’ या सूत्रानुसार वाटचाल करत त्यांनी दादा गटाच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला आहे.
विशाल पाटील हे वसंतदादांचे धाकटे नातू. घराण्याचे वलय, राजकीय धडाडी, व्यावसायिक यश, उपजत हुशारी, मुरब्बीपणा, जिल्ह्यासह आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास या त्यांच्या जमेच्या बाजू.
दोन वर्षांपूर्वी लोकसभा लढवायची की विधानसभा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून संजयकाका पाटील, तर सांगली विधानसभा मतदारसंघात सुधीर गाडगीळ या विद्यमान खासदार-आमदारांचे तगडे आव्हान होते. विशाल यांचा कल खासदारकीपेक्षा आमदारकीकडे अधिक होता, पण लोकसभेची निवडणूक आधी होती. विशाल यांनी सुरुवातीला उमेदवारी मागितली नाही, पण नंतर तयारी सुरू करताच लोकसभेची जागा काँग्रेसने आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली. तो सगळा ‘गेम प्लॅन’ होता. लढायचे की नाही, अशा संभ्रमात असताना त्यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी घ्यायला लागली. वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकरही रिंगणात उतरले. विशाल यांनी साडेतील लाखावर मते घेतली, पण पडळकरांनी घेतलेल्या तीन लाख मतांमुळे भाजपचे संजयकाका पाटील विजयी झाले. कारण पडळकरांनी विशाल यांचीच जादा मते खाल्ली. लोकसभेच्या पराभवानंतर लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीवर दावा करता आला नाही.
सध्याही तेच त्याच दि्वधावस्थेत आहेत. त्यामुळे ‘पिकेल तेव्हा गहू आणि नंतर पोळ्या’ या सूत्रानुसार त्यांनी दादा गटाच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला आहे. विशेषत: मिरज पूर्व-पश्चिम भागावर त्यांचा जोर आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा बॅंक, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका त्यांचे लक्ष्य आहे. प्रत्येक तालुक्यात विखुरलेला गट बांधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पण वसंतदादा साखर कारखाना खासगी कंपनीकडे चालवण्यास देऊन त्यांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक त्यांच्याकडे पुन्हा आश्वासक नेतृत्व म्हणून पाहू लागले आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी शरद पवारांशी जवळीक साधली आहे. मात्र राष्ट्रवादी त्यांना कितपत साथ देईल, हा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि जिल्ह्यातील त्या पक्षाची सूत्रे जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील यांचे दादा घराण्यावरील ‘प्रेम’ अख्खा महाराष्ट्र जाणतो!
------------------
पक्षनिश्चिती आणि आघाडीतील मित्रत्व
विशाल पाटील यांनी लोकसभा ‘स्वाभिमानी’च्या तिकिटावर लढवल्यानंतर ते त्या पक्षाच्या व्यासपीठावर कधीच गेले नाहीत. किंबहुना काँग्रेसच्या मोर्चे, आंदोलने, कार्यक्रमात दिसले. तरीही नुकत्याच झालेल्या जाहीर सभेमध्ये जयंत पाटील यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील’ असा उल्लेख करत कोपरखळी मारली होती. शिवाय जिल्ह्यातील काँग्रेसची सूत्रे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे आहेत. विश्वजित आणि विशाल यांच्यातील छुपा संघर्ष नेहमीच उफाळून येतो. जयंत पाटील आणि विश्वजित यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे सूर जुळण्यावर पुढील समीकरणे तयार होतील. अर्थात तसे सूर जुळण्याची शक्यता कमीच!