दत्ता पाटीलतासगाव : सलग दोन निवडणुका खासदार पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ढासळला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सुमारे ९ हजार ४११ मताधिक्य मिळाले. त्यामुळे खासदार पाटील यांचे लोकसभेसाठी हॅट्ट्रिक साधण्याचे स्वप्न भंगले.मात्र, निवडणुकीच्या सुरुवातीलाच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी थेट खासदार पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. अगदी सुरुवातीपासूनच घोरपडे यांनी विशाल पाटील यांच्यासाठी मैदानात उतरून खिंड लढवली. दुसरीकडे आमदार सुमनताई पाटील आणि युवानेते रोहित पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्टेजवर राहून विशाल पाटील यांना रसद पुरवली. त्यामुळेच तासगाव - कवठेमहांकाळ संजय पाटील यांचे होमग्राउंड असले तरी मतदारसंघातील दोन गट एकत्रित विरोधात आल्यामुळे आव्हान निर्माण झाले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पडलेली मते
- संजय पाटील - ९४,९९२
- गोपीचंद पडळकर - ५४,७८७
- विशाल पाटील - ४८,०४३
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत पडलेली मते -
- विशाल पाटील - ९५,४८६
- संजय पाटील पाटील - ८५,०७४
- चंद्रहार पाटील - ७,९४९
विजयाची कारणे
- विधानसभेसाठी भाजपकडून प्रभाकर पाटलांचे लाँचिंग केल्यामुळे ''आमचाच आमदार, आमचाच खासदार'' हा तासगाव तालुक्याचा पायंडा मोडीत निघाला.
- विधानसभेची रंगीत तालीम म्हणून राष्ट्रवादीने यावेळी फाटी आखून विशाल पाटलांचे काम केले.
- खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत दगा दिल्याची भावना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटात होती. त्यांचा पेरा फेडायचाच, असा चंग यावेळी घोरपडे गटाने बांधला. हा निर्णय विशाल पाटलांच्या पथ्यावर पडला.
- एकीकडे महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्यामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी दादा घराण्याचे असलेल्या संबंधाची साद घातल्यामुळे निर्माण झालेले भावनिक वातावरण फायदेशीर ठरले.
पराभवाची कारणे
- लोकसभा निवडणुकीच्या आधीच विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्यामुळे राष्ट्रवादीने धास्ती घेत कडाडून विरोध केला.
- बेरजेचे राजकारण करण्याऐवजी ''एकला चलो रे'' राजकारण करण्याच्या पद्धतीने तिसऱ्या आघाडीसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी फारकत घेतली.
- वर्चस्ववादाच्या अट्टाहासामुळे सलग दोन निवडणुका सहकार्य केलेल्या घोरपडे गटाशी शत्रुत्व निर्माण केले.
- विकासाच्या मुद्याऐवजी भावनिक किनार देण्यात विरोधकांना यश मिळाले. याउलट खासदार पाटील यांनी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवून ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आणण्यात अपयश आले.