सांगली : महाविकास आघाडीकडून उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अखेर बंडाचे निशाण फडकविले. लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा निर्णय त्यांनी रविवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला. मंगळवारी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.महाविकास आघाडीने सांगलीची जागा उद्धवसेनेला सोडली आहे. मात्र, काँग्रेसने त्यावरील दावा अद्याप सोडलेला नाही. सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी, अशी मागणी आमदार विश्वजीत कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे. १९ एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यात बदलाची अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फेही एक अर्ज दाखल करणार आहेत.महाविकास आघाडीत बदल झालाच नाही, तर पर्याय म्हणून ते अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल करतील. काँग्रेसच्या निर्णयावर बंडखोरीबाबतचा निर्णय अवलंबून असेल. त्याविषयी २२ एप्रिलपूर्वी निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.
विशाल पाटील बंडावर ठाम; अपक्ष, काँग्रेसतर्फेही उद्या अर्ज भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:20 PM