दादांच्या आठवणींनी विशाल पाटील भावुक; डोळे पाणावले, जुना वाद संपल्याचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:27 AM2024-04-17T05:27:49+5:302024-04-17T05:27:55+5:30
दिवंगत वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचा तात्त्विक वाद होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : दिवंगत वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचा तात्त्विक वाद होता. त्यांच्या निधनानंतर तो संपला आहे. पण, आजही आम्हाला त्या वादाची किंमत मोजावी लागत आहे. प्रत्येक वेळी माझ्या उमेदवारीला अडथळा कुठून येत आहे? जिल्ह्यात आणि राज्यात दादांनी काँग्रेस पक्ष वाढविला. मात्र, आज त्यांचे वारस म्हणून आम्हाला उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे, अशी खंत व्यक्त करताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील भावुक झाले. वसंतदादांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यात काही गोष्टींवरून वाद होते. त्यांच्या वारसांमध्येही तसाच वाद असल्याने विशाल पाटील यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर विशाल पाटील म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीतही पक्षाने सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मला निवडणूक लढवावी लागली. त्या पराभवानंतरच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाचे काम जिल्ह्यात करण्यास सुरुवात केली. प्रत्येक गावापर्यंत पक्ष पोहोचविला. तरीही वसंतदादा घराणे म्हणून मला एकाकी पाडले जात आहे, असे म्हणत विशाल पाटील भावुक झाले. त्यांचे डोळे पाणावले. कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही अश्रू दाटले.