सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील लढणार

By अशोक डोंबाळे | Published: March 8, 2024 06:08 PM2024-03-08T18:08:55+5:302024-03-08T18:09:41+5:30

पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील, उमेदवारी मिळण्यात अडचण नाही

Vishal Patil of Congress will contest from Sangli Lok Sabha constituency | सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील लढणार

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील लढणार

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीलोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच असणार आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हेच उमेदवार असणार आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.

काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसंबंधित सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर आमदार विक्रमसिंह सावंत पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, जितेश कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्रमसिंह सावंत म्हणाले, काँग्रेसचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी पक्षात अनेक चांगले बदल करण्यात येणार आहेत. सामान्य आणि बहुजन समाजातील तरुणांना पक्षात चांगली पदे देण्यात येणार आहेत. तरुणांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यात येणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो कायम राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे ठेवण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न चालू आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे निश्चित राहणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारीही विशाल पाटील यांनाच निश्चित झाली आहे.

तरुणांनो काँग्रेस पक्ष वाढवा : मोहनराव कदम

मोहनराव कदम म्हणाले, काँग्रेस पक्ष हा बहुजन आणि बारा बुलतेदारांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. या पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी तरुणांनी आळस झटकून कामाला लागले पाहिजे. काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी तरुणांनी झोकून देऊन काम केले पाहिले, असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले.

काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या निवडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच दिवसानंतर जिल्हा उपाध्यक्षासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शुक्रवारी निवडी केल्या. यामध्ये वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. सिकंदर जमादार, जिल्हा उपाध्यक्षपदी वाळवा तालुक्यातून नंदकुमार शेळके, संदीप जाधव, आनंदराव रासकर (कडेगाव), मिरज तालुक्यातून शिवाजी मोहिते, संभाजीराव पाटील, खजिनदारपदी सुभाष खोत, सरचिटणीसपदी सदाशिव खाडे, जत तालुक्यातून आण्णाराव ऋद्राप्पा पाटील, पलूस तालुक्यातून मिलिंद डहाके, मिरज तालुक्यातून शेखर तवटे यांना जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संधी दिली आहे.

Web Title: Vishal Patil of Congress will contest from Sangli Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.