सांगली : काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी विश्वजित कदम व पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी स्नेहभोजन मेळावा झाला. या स्नेहभोजनाला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही हजेरी लावली. त्यावरून आता महाविकास आघाडीत वादंग सुरू झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी गद्दारी करीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली, अशी टीका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी गुरुवारी केली. त्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आम्ही आघाडीचा धर्म पाळल्याचा दावा केला आहे.
जागेवरून होती नाराजीसांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही उद्धवसेनेला जागा सोडण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. परंतु, आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून प्रचारसभांना काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे उपस्थित राहत. मात्र, कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय राहिल्याची चर्चा आहे.
स्नेहभोजन हा गद्दारीचा पुरावाकाँग्रेसच्या नेत्यांनी गद्दारी केल्याचा स्नेहभोजन मेळाव्यातील विशाल पाटील यांची उपस्थिती हा पुरावा आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडे करणार असल्याची टीका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केली. मात्र, आम्ही महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत उपस्थित राहून आघाडी धर्म पाळला आहे. त्यामुळे विभुते यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.