सांगली : सांगली लोकसभेची विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नावातील ‘काँग्रेस’ शब्दावर पांढरा रंग फासला होता. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेस भवनला भेट देऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचा नवा डिजिटल फलक लावला. विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.सांगलीत शुक्रवारी मिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ‘सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी’ या नामफलकावरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासला होता. त्यानंतर शनिवारी विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन येथे येऊन जिल्हा काँग्रेस कमिटी असा नवा डिजिटल फलक लावला. तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी शांततेची भूमिका घेण्याची सूचना दिली.विशाल पाटील म्हणाले, आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो; परंतु कार्यकर्त्यांनी आपला राग आमच्यावर काढावा, काँग्रेस पक्षावर नको. कदाचित वैयक्तिक मी कुठेतरी कमी पडल्यामुळे हे सारे घडले आहे; परंतु देशपातळीवरील राजकारण करीत असताना, काही कटू निर्णय घ्यावे लागतात. सांगलीच्या जागेबाबत अजूनही आम्ही सकारात्मक आहोत. कार्यकर्त्यांनी पक्षावरील निष्ठा ढळू देऊ नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.काँग्रेस पक्षावर आमचा विश्वास : विशाल पाटीलजिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे. पक्षाकडे सांगली लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मुंबई, दिल्लीतील नेत्यांची चर्चाही केल्या आहेत. अजूनही मी सांगलीच्या जागेबद्दल सकारात्मक आहे. पक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते अजूनही सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याबाबत फेरविचार करतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
Sangli: संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला, विशाल पाटील यांनी नवा डिजिटल फलक लावला
By अशोक डोंबाळे | Published: April 13, 2024 6:35 PM