हणमंत पाटील
सांगली: सांगली जिल्ह्यातील तडजोडीच्या (सेटलमेंट) राजकारणाला तडे देत, प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी डावलण्यासाठी लावलेल्या षडयंत्राचा दरवाजा फोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा बहुमताने विजय झाला. त्यामुळे खासदार होऊन दिल्लीस्वारीचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता होती. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आले. त्याऐवजी जिल्ह्यात ताकत नसतानाही महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेची उमेदवारी पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आली. त्यामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची तुतारी असल्याची टीका झाली.विशाल पाटील यांना उमेदवारी डावलण्यामागे सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही नेत्यांचे तडजोडीचे राजकारण झाले. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या षडयंत्राला आम्ही फसलो, अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतील सभेत दिली. त्यामुळे जिल्ह्यातील षडयंत्राचे व तडजोडीचे राजकारण सांगलीच्या मतदारांनी उधळून लावले.
सहानुभूतीच्या लाटेवर स्वारी..सांगलीचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे घराणे संपविण्यासाठी त्यांच्या वारसदारांना उमेदवारी डावलली, त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वाचा प्रश्न आहे, अशा मुद्द्यांमुळे विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची लाट जिल्हाभर तयार झाली. त्यामुळे गावागावात व गटातटात विखुरलेला काँग्रेस कार्यकर्ता प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारीसाठी आग्रह केला. नेत्या ऐवजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतली. त्यामुळे मतदारसंघात विशाल पाटील यांच्या सहानुभूतीची लाट तयार झाली. या लाटेत विरोधी भाजपचे खासदार संजय पाटील व चंद्रहार पाटील यांच्यासाठी दिग्गज नेत्यांनी सभा घेऊनही त्यांचा पराभव झाला.