सांगली : शहरातील विविध भागांत घरफोड्या करणाऱ्या सराईतास विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. बाबू काजाप्पा मुंगली (वय २७, रा.शांतीनगर, मजरेवाडी, सोलापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांच्या वतीने खास पथकाद्वारे या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यात शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती कॉलनी परिसरात एक संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याची झडती घेतली असता, त्यात स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, एक्सा ब्लेड, हातोडा आढळला.
यानंतर, त्याने चोरीची कबुली दिली. त्याने संजयनगर व विश्रामबाग परिसरात सहा घरफोड्यांचे गुन्हे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून सोन्या-चांदीची दागिने व इतर असे दोन लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे, परिविक्षाधीन उपअधीक्षक मनिषा कदम, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, आदिनाथ माने, महंमद मुलाणी, दरीबा बंडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.