कडेगाव : पुरोहित कन्या प्रशाला सांगली येथे इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत असलेली खणभाग सांगलीतील आर्या अमोल चव्हाण ही चिमुकली मराठा आरक्षणाच्या लढ्यात जिद्द आणि चिकाटीने सहभागी झालेली आहे. उपोषणस्थळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भेट दिली. यावेळी आरक्षणप्रश्नी मागण्या प्रभावीपणे मांडणाऱ्या आर्याच्या जिद्दीने कदम प्रभावित झाले. त्यांनी तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली.आर्या सांगली येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी असून तिच्या वडिलांचे औद्योगिक वसाहत परिसरात मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. २०१७ च्या मराठा क्रांती मूक मोर्चात आर्या सहभागी झाली होती. यानंतरच्या एका मोर्चात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यासाठी अगदी लहान वयात आर्या पुढे गेली होती. त्यावेळी लहान वयात तिने मराठा समाज बांधवांच्या व्यथा मांडल्या होत्या. यानंतर अनेकदा मराठा क्रांती मोर्चात ती जिद्दीने सहभागी झाली. प्रभावी भाषणे केली. मागील आठवड्यापासून सांगलीत सुरू असलेल्या साखळी उपोषणात आर्या सहभागी झाली आहे. आर्यानेही उपोषण केले आहे.दरम्यान, आमदार डॉ. कदम यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आर्याशी संवाद साधला. तिने मराठा आरक्षणप्रश्नी प्रभावीपणे मागण्या मांडल्या. आर्याच्या लढाऊ वृत्तीने प्रभावित होऊन त्यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. सकल मराठा मोर्चात भेटलेली लहान बहीण मानून आर्थिक मदतीसह शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
तिला व्हायचंय जिल्हाधिकारीआर्याचे वडील अमोल चव्हाण म्हणाले, आमदार डॉ. कदम यांनी आर्याला डॉक्टर, इंजिनिअर किंवा तिच्या आवडीने कोणतेही शिक्षण घ्यायचे असले तरी ते शिक्षण मोफत देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ती अजून लहान आहे; परंतु ती जिल्हाधिकारी होणार असे म्हणत आहे. आमदार कदम यांनी स्वीकारलेल्या जबाबदारीबद्दल त्यांच्या दातृत्वाला माझा सलाम आहे.