कडेगाव : सांगली लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावरून एकमेकांवर आरोप करणारे कॉँग्रेसचे आ. विश्वजित कदम आणि आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यात रविवारी कडेगाव येथे बैठक झाली. पक्षांतर्गत वादावर पडदा टाकत या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत एकमेकांना साथ देण्याचे आश्वासन दिले.विशाल पाटील यांनी रविवारी दुपारी विश्वजित कदम यांची कडेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीतील रणनीतीविषयी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केल्यामुळे पक्षांतर्गत वातावरण तापले होते. शनिवारी विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पक्षातील नाराज नेत्यांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात त्यांनी विश्वजित कदम यांच्यापासून केली. या भेटीवेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम व कदम गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.दोन्ही नेत्यांनी झालेल्या वादावर पडदा टाकत भाजपविरोधात एकसंधपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी व सांगलीत काँग्रेस आघाडीचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण हातात हात घालून व खांद्याला खांदा लावून काम करू, असे विशाल पाटील यांनी सांगितले. यावर विश्वजित कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, ही निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी समर्थ साथ देणार असल्याचा विश्वास पाटील यांना दिला. अर्ज भरण्यासाठी पलूस-कडेगावसह जिल्'ातील काँग्रेस व घटकपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे कदम यांनी विशाल पाटील यांना सांगितले.
विशाल पाटील यांच्या हाती विश्वजित यांचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:51 PM