विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : फत्तेसिंगआप्पांची आठवण ही मनाला सद्गदीत करणारी आहे. आनंदरावतात्यांचा संयमी, समजूतदारपणा व विश्वासराव भाऊ यांचा तडफदारपणा यांचा संगम आप्पांच्या स्वभावात होता. शिराळा पेट्याची रग आणि वारणेचा जिव्हाळा दोन्ही त्यांच्या स्वभावात एकवटली होती. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात हरित क्रांती घडवून नंदनवन केले. हे तालुके उत्कर्ष आणि विकास साधण्याचा रस्ता त्यांच्या स्वभावातील गुणवैशिष्ट्यांमुळे उजळून निघाला आहे .
स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि प्रतिसरकारच्या आंदोलनात सुप्रसिद्ध सातारा क्रांतीच्या आघाडीवर असणारा त्यावेळचा ‘शिराळा पेटा’ स्वातंत्र्यानंतर मात्र बराच गोंधळात पडला होता. सांगली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर शिराळा पेट्याला तालुक्याचा दर्जा मिळूनही स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाच्या आणि विकासाच्या आघाडीवर शिराळा पेटा मागे ठेवण्यात आला. वारणा, कृष्णा, कोयना या नद्यांच्या पाण्यावर आसपासचे तालुके सहकारी, कृषी, औद्योगिक समाजरचनेच्या विकास आघाडीवर दिमाखाने तळपत राहिले. त्या तालुक्यातील अनेक नेते राज्य पातळीवरचे नेते म्हणून चमकले. पण शिराळा पेट्याला वारणेवरील धरणाच्या जागेच्या वादात अडकवून ठेवून स्वातंत्र्यपूर्वीच्या वातावरणात खुरडत ठेवण्यात आले. निम्मा तालुका खुजगाव धरणाच्या पाण्याखाली जाणार म्हणून रस्ते, वीज, उद्योगधंदे या सर्वच बाबतीत दुर्लक्ष करण्यात आले. विश्वासराव भाऊ आणि आनंदराव तात्या यांनी त्या विपरित परिस्थितीतही सहकारी ‘जयभवानी’ साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोऊन सहकार, कृषी, औद्योगिक समाजरचनेच्या आघाडीवर इतर तालुक्याच्या पुढाऱ्यांच्या राजकारणामुळे आणि वारणा नदीत वाळू उपसल्याशिवाय पाणी मिळणार नाही, अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे शिराळा तालुका मागासच राहिला.
विश्वासराव भाऊंच्या आकस्मिक निधनामुळे सारा तालुका लंगडा झाला. त्यातूनही आनंदरावतात्यांनी उतार वयात हिम्मत बांधून तालुक्याचे नेतृत्व केले.
यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने धरण जागेच्या वादातून शिराळा तालुका बाहेर पडला. खुजगावऐवजी चांदोली येथे धरण बांधले आणि वारणा खोऱ्याला नवजीवन दिले. जवळजवळ बंद पडलेला जयभवानी सहकारी साखर कारखाना विश्वासरावभाऊंचे नाव देऊन पुन्हा चालू केला. चांदोली धरणाचे पाणी मिळायला लागल्यापासून वारणा खोऱ्याचा बरकतीचा संसार चालू लागला. तात्यांच्यानंतर साखर कारखान्याची सूत्रे फत्तेसिंगराव नाईक आप्पांच्या हाती आल्यानंतर शिराळा तालुका अंधारातून उजेडात आल्यासारखे वाटले. अतिशय संयमाने राजकीय वादविवाद टाळून साखर कारखान्यावरच लक्ष केंद्रीत करून द्रष्टेपणाने साखर कारखान्याचा संसार पुन्हा उभा केला. डोंगर, पर्वत, टेकड्यांचा शिराळा पेटा मोठ्या जिद्दीने अनेक सहकारी पाणी पुरवठ्यांच्या योजना आखून आणि त्या मोठ्या जिद्दीने पूर्ण करून त्यांनी बागायत केली. ‘वारणेची माती’ आणि ‘वारणेचे पाणी’ ऊस पिकाच्याबाबतीत अत्यंत कसदार आहे, याची प्रचिती महाराष्ट्र आणि साऱ्या देशाला दिली.
शिराळा व शाहूवाडी तालुक्यात माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्याबरोबर राहून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून साखर कारखान्याची घडी नीट बसविल्यामुळे गांजण्यांचे पोळे असलेला तालुका मधमाशांच्या पोळ्यासारखा संपन्न होऊ लागला. हजारो शेतकऱ्यांचे संसार बरकतीला आले. हजारो तरुण कामधंदा करू लागले. पोट भरण्यासाठी मुंबईला जाणारे तालुक्यातील लोकही गावात थांबू लागले .
शिराळा तालुक्याने जवळजवळ एका पिढीचे अंतर तोडून इतर तालुक्यांच्या बरोबरीला येण्याचा फत्तेसिंगआप्पांच्या नेतृत्वाखाली पराक्रम करून दाखविला. तालुक्याच्या राजकारणातील गटबाज्या आणि कुटुंबातील भाऊबंदकीचे प्रश्न ज्या संयमी आणि समजूतदारपणाने फत्तेसिंगआप्पांनी सोडविले, तेही फार लक्षवेधी आहे. दूरदृष्टीने विचार करून पावले उचलण्याची आप्पांची कार्यपद्धतीही खरोखरच मोठी अनुकरणीय आहे. नव्या पिढीने हा त्यांचा वारसा फार काळजीपूर्वक जपला पाहिजे. आप्पांचा मनमिळावू स्वभाव, अत्यंत सचोटीची मैत्री आणि दिलेला शब्द पाळण्याची जिद्द यांच्यातूनच त्यांनी आपली विश्वासार्हता निर्माण केली. सार्वजनिक जीवनामध्ये अशी विश्वासार्हता आणि सचोटी हे फार अनमोल गुण आहेत. फत्तेसिंगआप्पांची निसर्गात रमण्याची ओढ, ही त्यांच्या स्वभावातील अत्यंत मनोरम अशी प्रवृत्ती होती. चांदोलीच्या जंगलात जाऊन दरवर्षी चार-सहा दिवस राहण्याची, माणसांच्या व्यवहारातून थोडाकाळ तरी बाहेर येऊन निसर्गाशी एकरूप होण्याची त्यांची मनोवृत्ती होती. ही एखाद्या साहित्यिकाची किंवा संवेदनशील कवीचीच प्रवृत्ती होय. असा संवेदनशीलपणा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातील राजकीय व सार्वजनिक नेत्यांत यशवंतराव चव्हाण सोडले, तर इतरत्र किंवा महाराष्ट्रातील राजकीय व सार्वजनिक नेत्यांत क्वचितच आढळणारी प्रवृत्ती आहे .
आज महाराष्ट्रात आणि विशेषत: दक्षिण महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, तात्यासाहेब कोरे या मंडळींनी रंगवलेली आणि पायाभरणी केलेली सहकारी-कृषी-औद्योगिक समाजरचनेची स्वप्ने मोठ्या अडचणीत आलेली आहेत. याला मुख्यत्वे गटपक्षांच्या सत्ताबाजीचे राजकारण, उपलब्ध निसर्गसाधनसंपत्तीची मनमानी पध्दतीने केलेली उधळण आणि प्रदूषण व अदूरदर्शी अर्थकारण या गोष्टी कारणीभूत आहेत. सहकारी संस्थांची अवस्था मोठी चिंताजनक आहे. या संस्था स्थापन करून उभा करणाऱ्या देशभक्तांचे वारसदार घराणेशाही, सरंजामशाही आणि सत्ताबाजी यातच गुंतून पडलेले आहेत. मात्र आप्पांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यात या गोष्टींची लागण झाली नाही, तसेच फत्तेसिंगआप्पांनी ज्या संयमाने, समजूतदारपणाने आणि दूरदृष्टीने साखर कारखाना आणि तालुका चालविला, हा आदर्श घेऊन त्यांच्या वारसाचे नीट-नेटके जतन विद्यमान आमदार व कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे करीत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे.