सांगली : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळी कॉँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची त्यांच्या विजय बंगल्यावर भेट घेतली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेसाठी मंगळवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीत आले. बुधवारी सकाळी ते शासकीय विश्रामगृहावरून थेट माजी मंत्री मदन पाटील यांच्या विजय बंगल्यावर गेले. यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. कॉँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांची पवार यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली. महापालिका निवडणूक, त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक यासह अन्य विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. पवार व माजी मंत्री मदन पाटील यांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. मदनभाऊंच्या निधनानंतर पवार यांनी जयश्रीताई व त्यांच्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ देणार असल्याचे जाहीर केले होते. अजित पवार व मदन पाटील कुटुंबियांत नातेसंबंधही आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी जयश्रीताई पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. निवडणुकीबाबत पवार यांनी माहिती घेतली तसेच मदन पाटील गटाला बळ देण्याची ग्वाही दिल्याचे समजते.राजकीय चर्चा नाहीजयश्री पाटील म्हणाल्या, अजित पवार व आमच्या कुटुंबाचे नातेसंबंध आहेत. त्यामुळेच ते सांगलीत आल्यानंतर घरी आले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी माहिती घेतली. पण कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीबाबत किंवा अन्य कोणत्याही राजकीय विषयावर यावेळी चर्चा झाली नाही. ही घरगुुती भेट होती, असे मत काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील यांनी व्यक्त केले.
अजितदादा-जयश्रीतार्इंची भेट, सांगली महापालिका निवडणुकीवर चर्चा; मदनभाऊ गटाला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:30 AM