कडेगाव (जि. सांगली) : इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार सोहळा हजारों भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला.मंगळवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर ,शिवाजीनगर ,विहापुर ,सोहोली ,निमसोड ,वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला.
येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान , आत्तार, शेटे ,माईनकर आणि अन्य लहान-मोठे ताबूत माना प्रमाणे उचलण्यात आले.त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा ताबूत उचलण्यात आला.त्यानंतर ताबूतांची प्राथमिक भेटी सोहळा पाटील वाडा(चौकात) संपन्न झालात्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. यावेळी दरम्यान वाटेत तांबोळी ,शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले.
सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले.त्या ठिकाणी कर्बल , बुधवार पेठ व शुक्रवार पेठ मेलवाल्याकडून "महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर" ,"तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा , अब एकीका कर दो पुकाराह्ण ह्यहिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे" अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे , बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. यामध्ये मानाचा सात भाई- पाटील-इनामदार -सुतार-अत्तार-बागवान-माईनकर- तांबोळी-देशपांडे-मसूदमाता -बारा इमाम पंजे- मसूदमाता पंजे वगैरे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी उत्साहात पार पडल्या.
माना प्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला.त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले.दुपारी 2.30 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले. दरम्यान सकाळी 7 वा पासून विटा ,कराड ,सांगली ,सातारा ,कोल्हापूर ,पुणे ,मुबईसह कर्नाटकातून लोक मिळेल त्या वाहनाने कडेगावला येत होते. गावातील रस्ते ,गल्ली ,बोळ आबालवृद्धांनी गजबजून गेले होते.तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम,आमदार पृथ्वीराज देशमुख,जि.प.अध्यक्ष संग्रामसिह देशमुख,जयंत पाटील (कऱ्हाड),भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, भीमराव मोहिते,जितेश कदम,नगराध्यक्षा नीता देसाई,उपनगराध्यक्ष राजू जाधव,चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील,दीपक भोसले,धनंजय देशमुख,विजय शिंदे,रविंद्र देशपांडे,नगरसेवक नितीन शिंदे,सागर सूर्यवंशी,उदयकुमार देशमुख,संगीता राऊत,रिजवाना मुल्ला,संगीता जाधव,मालन मोहिते, तहसीलदार अर्चना शेटे,नायब तहसीलदार राजेंद्र यादव आदी मान्यवर व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांचेसह हिंदू-मुस्लिम बांधव,भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.