विटा : सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटा शहरातील पोलीस ठाण्याचे रूपडेच बदलले आहे. आयएसओ नामांकनासाठी विटा पोलीस ठाणे सज्ज झाले आहे. पोलीस ठाण्याचा परिसर तसेच अंतर्गत भागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारात उभारणी केलेला सेल्फी पाॅईंटही लक्षवेधी ठरला आहे. याशिवाय खानापूर तालुक्याचा इतिहास आणि धार्मिक स्थळांची माहिती सांगणारी चित्रफीतही पोलीस ठाण्यात नियमित सुरू असते.
सध्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची आयएसओ नामांकनासाठी तपासणी सुरू आहे. त्यामुळे पोलीस ठाणे चकाचक आणि सर्वसोयींनीयुक्त करण्याबरोबरच स्पर्धेत टिकण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे व त्याअंतर्गत असलेले शस्त्रागार, मुद्देमाल कक्ष, लॉकअप, दप्तर शाखा, ठाणे अंमलदार कक्ष, गोपनीय विभाग, आदी विभाग सर्वसोयींनीयुक्त केले असून अत्यंत सुनियोजनाने त्याची मांडणी करण्यात आली आहे.
विटा पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या आजूबाजूला पेव्हिंग ब्लॉक बसवून सुशोभीकरण करण्यात आले आहे. पुढील बाजूला सेल्फी पॉईंटची उभारणी केली आहे. शस्त्रागारात अत्यंत आकर्षक पद्धतीने शस्त्रांची मांडणी केली आहे. जप्त मुद्देमाल कक्षात गुन्हा रजिस्टरप्रमाणे मांडणी केली गेली आहे. प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ लोकांना माहिती मिळेल अशा पद्धतीने फलक लावण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची माहिती दर्शविणारा फलकही ठेवण्यात आला आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठाणे अंमलदार कक्षाजवळ खानापूर तालुक्याचा इतिहास, धार्मिक व पर्यटन स्थळांची माहिती सांगणारी चित्रफीत लोकांना पाहावयास मिळत आहे. यासाठी अतिरिक्त उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे, जालिंदर जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
चौकट :-
खानापूर दूरक्षेत्र टकाटक...
विटा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले खानापूर पोलीस दूरक्षेत्र आयएसओच्या निमित्ताने टकाटक झाले आहे. तालुका हद्दीवर पोलीस ठाण्याची हद्द सांगणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे विटा पोलीस ठाणे आयएसओच्या नामांकन स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.
फोटो - ३००७२०२१-विटा-पोलीस ठाणे इमारतीचा फोटो वापरणे.