कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने त्याचा ताण महानगरपालिकेच्या बेस्ट बसेसवर पडला होता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमार्फत मुंबईकरांच्या प्रवासाची सोय करण्यात आली होती. त्यासाठी विटा आगारातून बसेस पाठविण्यात आल्या आहेत. प्रत्येक आठवड्याला विटा आगारातून १४ चालक व १४ वाहक मुंबईत सेवा बजावत होते.
त्यासाठी विटा आगारातून शनिवारी गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत चालक सर्जेराव मस्के गेले होते. रविवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यावेळी रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र, रविवारी सायंकाळी सहा वाजता जास्तच त्रास झाल्यानंतर ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले.
त्यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती आंबेगाव व विटा आगारात समजताच गावावर शोककळा पसरली. चालक मस्के हे विटा आगारातील एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. राज्य परिवहन महामंडळात त्यांनी १७ वर्षे सेवा बजावली होती.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहावर सोमवारी रात्री आठ वाजता आंबेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विटा आगार प्रमुख अविनाश थोरात यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
फोटो - २२०२२०२१-विटा-सर्जेराव मस्के, बसचालक.