विटा : करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून, खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ कर्नाटकच्या प्रवासी बसचा अपघात नुकताच टळला.
केंद्र शासनाने गुहागर ते विजापूर या राष्टय महामार्ग निर्मितीला सुरुवात केली आहे. रेणावीपासून पुढे भिवघाटपर्यंत या महामार्गाचे काम गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. जुना राज्यमार्ग खोदून रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यावर तामखडीजवळ लाल मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारी कर्नाटक राज्याची खानापूरकडे जाणारी बस या चिखलामुळे घसरत नाल्याकडील बाजूला गेली.
मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने या बसचा अपघात टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बसबरोबरच खासगी चारचाकी वाहने व दुचाकीस्वारांनाही या महामार्र्गाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीही रेवणगावजवळ चिखलामुळे वाहने घसरू लागल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, हैदराबादकडे जाणाऱ्या बसेसची वाहतूक लेंगरे, भूडमार्गे वळविण्यात आली होती.
शनिवारीही पावसाने दलदल झाल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. विटा ते खानापूर या नवीन राष्टÑीय महामार्गाचे अर्धवट काम सोडून ठेकेदार गायब झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने त्याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सध्या तरी पावसामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वारेमाप चिखल झाल्याने प्रत्येक वाहन घसरत आहे. वाहनधारक व प्रवाशांना या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.विटा ते खानापूरदरम्यान सुरू असलेल्या नवीन राष्टÑीय महामार्गावर पावसामुळे दलदल झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटक राज्याच्या प्रवासी बसला होणारा अपघात चालकाच्या प्रसंगावधानाने टळला.