विटा : विटा बसस्थानकात फलाटावर येत असलेल्या एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून सचिन प्रकाश मस्के (वय १४, रा. खंबाळे भा.) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) येथील सचिन मस्के विट्यातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी जाण्यासाठी मित्रांसोबत बसस्थानकात आला होता. विटा-पलूस (क्र. एमएच १२ ईएफ ६०८२) ही बस फलाट क्रमांक सहावर येत होती. गर्दी असल्याने जागा पकडण्यासाठी प्रवाशांनी या बसकडे धाव घेतली. त्या गडबडीत सचिन मस्के बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडला. गंभीर अवस्थेत त्याला मित्रांनी उपचारासाठी विट्यातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच खंबाळे (भा.) येथून सचिनचे नातेवाईक विट्यात आले. अपघातानंतर मॉडर्न एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, मुख्याध्यापक डी. पी. कुलकर्णी यांनी रूग्णालयाकडे धाव घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे. (वार्ताहर)
विट्यात बसखाली शाळकरी मुलगा ठार
By admin | Published: January 05, 2016 1:01 AM