विटा : विटा परिसरासह मिरज व कडेगाव हद्दीत झालेल्या घरफोडीचे १६ गुन्हे उघडकीस आणून तीन संशयित चोरट्यांना गजाआड करणारे विटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्यासह पोलीस पथकाचा प्रभारी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील पवार उपस्थित होते.
विटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्यासह पथकाने पोलीस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या १४ घरफोडीचे गुन्हे व मिरज आणि कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे घरफोडीचे १६ गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातील सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.विटा पोलिसांच्या या कामगिरीची दखल घेऊन प्रभारी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्याहस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ, हवालदार रवींद्र धादवड, नाईक सुनील पाटील, शिपाई विवेक यादव, नितीन यादव, विलासराव मुंढे या पथकाचा गौरव केला.