विटा : सोशल मीडियावरील एका पोस्टवरून गुरुवारी रात्री माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या विट्यातील संपर्क कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. या हल्ल्यात तुषार सदाशिव सपकाळ हे जखमी झाले. त्यानंतर माजी आ. पाटील समर्थक सुमारे पाचशे ते सातशे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी विक्रम विठ्ठल भिंगारदेवे व महेश लक्ष्मण भिंगारदेवे या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही राजकीय कार्यकर्त्यांनी विरोधी गटाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. गुरुवारी दुपारी श्री रेवणसिद्ध मंदिरात माजी आ. पाटील समर्थक कार्यकर्ता व विरोधी गटातील कार्यकर्त्यांत या पोस्टवरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारी व तोडफोडीत झाले. गुरुवारी सायंकाळी विरोधी गटातील विक्रम भिंगारदेवे याच्यासह काही कार्यकर्त्यांनी सदाशिवराव पाटील यांच्या यशवंतनगर येथील संपर्क कार्यालयात घुसून कार्यालयाच्या काचा फोडून मोडतोड केली. त्यावेळी कार्यालयातील तुषार सपकाळ या कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सपकाळ यांच्या कपाळाला व डाव्या हाताच्या कोपरावर मार लागल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती शहरात समजताच सदाशिवराव पाटील समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले. हे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस निरीक्षक मोहन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे, उपनिरीक्षक ए. टी. सुनगार, अमोल शिंदे यांच्यासह पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला.संतप्त झालेले कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलिस निरीक्षक जाधव यांनी संबंधितांविरुद्ध फिर्याद द्या, कारवाई करतो, असे आश्वासन दिले. काही वेळानंतर सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष वैभव पाटील, विशाल पाटील पोलिस ठाण्यात आले. ‘आम्ही गाव शांत रहावे, यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असून, संयमाची भूमिका घेत आहोत. परंतु, आमच्या संयमाचा गैरफायदा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता संबंधित दोषींवर कारवाई करावी’, अशी मागणी सदाशिवराव पाटील यांनी केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक जाधव यांनी घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे सांगून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सदाशिराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर जमाव तेथून निघून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)आज विटा बंदसदाशिवराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर गुरुवारी हल्ला झाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी विटा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी अटक न केल्यास विटा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णयही कार्यकर्त्यांनी घेतल्याचे समजते.दंगलनियंत्रण पथक दाखल...शहरात प्रचंड तणाव निर्माण झाल्यानंतर विटा, आटपाडी, चिंचणी, तासगाव, कडेगावहून पोलिस कुमक मागविण्यात आली. सांगलीहून दंगल-नियंत्रण पथक दाखल झाले आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तातडीने विटा पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली.
विट्यात मारामारी, तोडफोड
By admin | Published: April 07, 2016 11:44 PM