लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्व. चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुलातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेघा विश्राम गुळवणी यांची राष्ट्रीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयीन प्राचार्य संघटनेच्या (पेस) उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे डॉ. गुळवणी यांना महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी या सध्या शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालय संघटनेच्या अध्यक्षा म्हणून काम करीत आहेत. विटा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातही त्या प्राचार्या पदावर काम करीत आहेत. आता त्यांची राष्ट्रीय महाविद्यालयीन प्राचार्या संघटनेच्या उपाध्यक्षपदाचाही पदभार स्वीकारला आहे. या निवडीनंतर नूतन उपाध्यक्षा, प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी यांनी राष्ट्रीय पातळीवर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सुसूत्रीकरण तसेच अभ्यासक्रमांची आखणी करणे आणि महाविद्यालयांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
या निवडीनंतर प्राचार्या डॉ. गुळवणी यांचे आ. अनिल बाबर, मॉडर्न सोसायटीचे अध्यक्ष विनोद गुळवणी, उपाध्यक्ष सुधाकरशेठ शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.