फोटो ०८विटा०१:- विटा येथील भारती विद्यापीठाची विद्यार्थिनी रिद्धी टिंगरे हिने राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळविल्याबद्दल तिचा मुख्याध्यापक अजय लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : येथील भारती विद्यापीठच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता नववीतील रिद्धी राहुल टिंगरे या विद्यार्थिनीने विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून, तिची इन्स्पायर अवॉर्ड मानक या वैज्ञानिक क्षेत्रात निवड झालेली आहे. तिने ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ‘सुगम वॉकर’ हे अत्याधुनिक व बहूपयोगी उपकरण तयार करून, त्याचे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रदर्शनात सादरीकरण करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विटा येथील रिद्धी टिंगरे ही भारती विद्यापीठच्या इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असे ‘सुगम वॉकर’ हे अत्याधुनिक उपकरण तयार केले होते. हे उपकरण तिने प्रथम तालुका, नंतर जिल्हा व त्यानंतर राज्य या तिन्ही स्तरांवर उत्कृष्टपणे सादर केल्याने तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती.
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात देशातील एकूण ५८१ उपकरणांचे सादरीकरण झाले. त्यांपैकी ६० उपकरणांची निवड करण्यात आलेली होती. यावेळी महाराष्ट्रातून ४ उपकरणांची निवड करण्यात झाली. त्यात विटा येथील रिद्धी राहुल टिंगरे हिच्या उपकरणाची निवड झाल्याने रिद्धी हिने वैज्ञानिक क्षेत्रात गरुडभरारी घेतली आहे
रिद्धी हिला भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमधील विज्ञान शिक्षिका भारती श्रीकृष्ण लाड, स्वाती पवार, अंजली गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक अजय लांडगे यांच्यासह शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.