विटा : येथील बळवंत महाविद्यालयाच्यावतीने खानापूर तालुक्यात 'माझे गाव-कोरोनामुक्त गाव' अभियानाला सुरुवात झाली. तालुक्यातील सहा गावे दत्तक घेतली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी गुरुवारी दिली.
प्राचार्य डॉ. मोरे म्हणाले, या अभियानात सर्वांना अवगत असणारे व्हाॅट्स-ॲप सोशल मीडिया वापरात येत आहे. महाविद्यालयाने खानापूर तालुक्यातील विटा, पारे, आळसंद, कुर्ली, साळशिंगे व गार्डी ही सहा गावे दत्तक घेतली आहेत. या प्रत्येक गावांचे व्हाॅट्स-ॲप ग्रुप तयार करण्यात आले असून, यात गावातील सरपंच, दक्षता कमिटी, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व शिक्षक यांना समाविष्ट केले आहे. या प्रत्येक गावात महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक जाऊन कोरोनाग्रस्तांना मदत करीत आहेत. दररोज ऑनलाईन प्रबोधन व्याख्यानमालाही आयोजित केली आहे.