सांगली : भरधाव मोटारीने धडक दिल्याने सतीश धनसरे (रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, विश्रामबाग) या तरुणाचा मृत्यू झाला. पण विश्रामबाग पोलिसांनी या अपघातातील मोटार चालकाला ‘क्लीन चिट’ देत, त्याला वाचविण्यासाठी धनसरे यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप धनसरे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन योग्य तपास करावा, अशी मागणी या कुटुंबाने जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ३१ आॅगस्ट २०१८ रोजी सतीश धनसरे हे दुचाकीवरुन (क्र. एमएच १० सीडब्ल्यू-२५५४) सांगली-मिरज रस्त्यावरुन घरी निघाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानासमोर त्यांना मोटारीने (क्र. केए २८ डी-०५८०) जोराची धडक दिली होती. यामध्ये धनसरे दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा अपघात राहुल मदने (वानलेसवाडी) व आबासाहेब कांबळे (समतानगर, मिरज) यांनी प्रत्यक्षात पाहिला होता. मदने यांनीच धनसरे यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरु असताना धनसरे यांचा मृत्यू झाला होता.
मोटारीचा मालक रावताप्पा मल्लाप्पा हंडी (नंदीहळ, ता. वागेवाडी, जि. विजापूर) याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला होता. पण पोलिसांनी याचा कोणताही तपास केला नाही. धनसरे दारू पिऊन वाहन चालवित होते व तेच या अपघाताला जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल केला. अपघातानंतर मोटारचालक हंडी पळून गेला होता. त्याच्या मोटारीचे मागील टायर फुटले होते. धनसरे यांची दुचाकी धडकल्यानेच मोटारीचे टायर फुटल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद आहे. हंडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन न्याय देण्याची मागणी केली आहे.न्यायासाठी धडपडधनसरे कुटुंबीय चार महिन्यांपासून न्यायासाठी धडपडत आहे. मृत धनसरे यांच्या पत्नी ज्योती या दोन मुले व सासू, सासऱ्यासमवेत राहतात. घरची स्थिती हलाकीची आहे. तरीही विश्रामबाग पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आमदार, पोलीसप्रमुख यांना निवेदन देऊन हंडीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.