सांगली : सांगलीविधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप जनजागृतीबाबत दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी मतदार जागृती शपथ व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
हा कार्यक्रम केडब्लूसी महाविद्यालय, लॉ कॉलेज व जी.ए. महाविद्यालय सांगली, येथे संयुक्तिक आयोजित करण्यात आला. यावेळी सांगली विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा उपायुक्त राजेंद्र तेली, महानगरपालिका प्रशासनाधिकारी हणमंत बिराजदार आदि उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा व एक बळकट सशक्त लोकशाही निर्माण व्हावी याकरिता जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. नव मतदारांनी स्वतः मतदानाचा अधिकार बजावायचा आहे, तसेच आपल्या परिसरातील आपले मित्र, नातेवाईक यांनाही मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांमधील 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व एनसीसी चे 100 विद्यार्थी मतदान शपथ कार्यक्रमासाठी सहभागी झाले. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक अनुभव देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. व्ही बी कोडक, प्राचार्य डॉ. लाडगावकर, प्राचार्य जोशी यांनी केले. एनसीसी विभाग प्रमुख डॉ. सुभाष पाटील, सौ. हिरुगडे, उपप्राचार्य डॉ. पी एन गोरे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.