सांगली : राष्ट्रीय मतदारयादी शुध्दीकरण व प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत आधार क्रमांक मतदारयादीशी लिंक करण्याची विशेष मोहीम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी रविवार, दि. १२ जुलैरोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.छायाचित्र मतदार ओळखपत्र व आधारकार्ड यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे व चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदारयादी करणे असा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या विशेष मोहिमेव्यतिरिक्त इतर कार्यालयीनदिवशी हा कार्यक्रम संबंधित तहसीलदार कार्यालयात व सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयात चालू राहणार आहे. मतदारांनी मतदारयादीतील नावाची खात्री करावी. मतदार यादीतून वगळलेल्या व वगळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नावांची यादी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. नागरिकांनी मतदार यादीतील दुबार, मृत व स्थलांतरित नावे वगळण्यासाठी स्वत:हून किंवा कुटंबातर्फे अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.आधार क्रमांक मतदारयादीशी जोडण्याच्या यापूर्वी घेण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील ६३ हजार मतदारांचे आधार कार्ड मतदारयादीशी जोडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मतदार यादी-आधार लिंकसाठी मोहीम
By admin | Published: July 09, 2015 11:38 PM