सांगली : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या. मात्र मंगळवार, दि. ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदानावेळी मतदारांच्या व्होटर स्लिपांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मतदारांना व्होटर स्लिपा मिळाल्या नाहीत. याशिवाय मतपत्रिकेतील घोळही दिसून आला. विविध पक्षांनीही मतदारापर्यंत व्होटर स्लिपा देण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील दोन हजार ४४८ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात बहुतांशी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु मतदारांना तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागल्याचे स्पष्ट झाले. मागील दीड महिन्यांपासून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रत्यक्ष मतदानावेळी मतदारांना व्होटर स्लिपा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी झाल्या. काही ठिकाणी प्रशासन व राजकीय पक्षांकडून देखील अनेक मतदारांच्या घरी ’व्होटर स्लीप’ पोहोचलेल्या नव्हत्या.
बूथपातळीवरील कार्यकर्तेही फिरकलेच नाहीसांगली शहरासह ग्रामीण भागातील अनेक मतदारांची नाहक पायपीट झाली. राजकीय पक्षांनी बूथपातळीवर कार्यकर्ते तैनात करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडूनदेखील काही नागरिकांना व्होटर स्लीप पोहोचल्याच नव्हत्या, त्यामुळे नेमके मतदान कुठे करावे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
मतपत्रिकेतील घोळामुळे मतदारांना मनस्तापकाही ठिकाणी मतदार यादीमधील घोळाचा फटका बसला. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे मतदान केंद्र मिळाल्याचे सांगली, कुपवाड शहरात चित्र होते. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे मतदान केंद्र कसे काय मिळू शकते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होता. काही मतदारांना वेगळाच मनस्ताप झाला. मतदान कार्ड असून देखील नाव मतदार यादीतच नव्हते. असे प्रकार अनेक मतदार केंद्रांवर घडले.
पहिल्यांदाच कर्तव्य बजावल्याचे समाधानसांगली मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचे प्रमाण जास्त दिसून आले. नवमतदारांमध्ये मतदान करण्याचा उत्साह देखील होता. प्रथमच राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे समाधान नव मतदारांच्या चेहऱ्यावर दिसून आले.