सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १६) राज्यभरात मतदान होत आहे. कार्यकारिणीच्या ६० जागांसाठी २८ हजार मतदार मतदान करतील. भाऊसाहेब भोईर, मेघराज राजेभोसले, सुहास जोशी, सुरेश धोत्रे, शंकर रेगे, सत्यजित धांडेकर, समीर हम्पी यांच्यासह २० उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह आणि प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनेल' आमनेसामने आहेत. अपक्षांसह एकूण १०३ उमेदवार रिंगणात आहेत. राज्याच्या विविध विभागातील २८ हजार ३११ सभासद मतदार त्यांचे भवितव्य ठरवतील. रविवारी राज्यात २९ केंद्रांवर मतदान होईल. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. सांगली जिल्ह्यात भावे नाट्यगृह, सांगली, राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी, इस्लामपूर व महात्मा गांधी विद्यालय, विटा येथे मतदान केंद्रे आहेत. कोणीही सभासद कोणत्याही केंद्रावर मतदान करु शकतो. सांगली जिल्ह्यात रंगकर्मी मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, संदीप पाटील व प्रशांत गोखले रिंगणात आहेत.
गेली पाच वर्षे प्रसाद कांबळी यांचे नाट्य परिषदेवर वर्चस्व होते. त्यांच्या कारकिर्दीत वादंगाचा कडेलोट झाला. अर्थात, गेल्या काही वर्षांत नाट्य परिषद आणि वाद हे समीकरणच बनून गेले आहे.
शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी महत्वाची निवडणूकशंभराव्या नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमांची सुरुवात सांगलीतून करण्याचे नियोजन नाट्य परिषदेने २०१८ मध्ये केले होते. पण त्यानंतर दोन वर्षे कोरोनामुळे संमेलन होऊ शकले नाही. कोरोना संपला, पण नाट्य परिषदेतील भांडणे टोकाला पोहोचली. या भांडणात पदाधिकाऱ्यांना नाट्य संमेलनाच्या आयोजनाला फुरसतच मिळाली नाही. हा वाद शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या मुळावर उठला. जब्बार पटेल, सतीश आळेकरांसारख्या जुन्याजाणत्या व दिग्गज रंगकर्मींनीही परिषदेपुढे हात जोडले. वाद संपवून संमेलन घेण्याची विनंती केली. पण तसे झाले नाही. आता नवी कार्यकारिणी सत्तेवर आल्यानंतरच संमेलनाचे भवितव्य ठरणार आहे.