सांगली : मोठ्या चुरशीने लढल्या गेलेल्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात आज, शुक्रवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील वर्चस्व अबाधित राखत गावचा गड सांभाळण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बिनविरोध झालेल्या ९ ग्रामपंचायती वगळता इतर ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. रॅली, कोपरा सभा आणि घरोघरी प्रचार करत कार्यकर्त्यांनी वातावरण ढवळून काढले होते. अनेक गावांमध्ये राज्यपातळीवरील नेत्यांनीही प्रचारात हजेरी लावली होती. जिल्ह्यातील १५०८ जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी ३०७१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
चौकट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्व नियमांचे पालन आवश्यक करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर व बाहेरही कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये. मतदानासाठीच्या रांगेतही विशिष्ट अंतर असावे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
चौकट
सोमवारी निकाल
आज, शुक्रवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी, दि. १८ रोजी मतमोजणी तालुका पातळीवर करण्यात येणार आहे.
चौकट
संवेदनशील गावांत विशेष बंदोबस्त
निवडणुका होत असलेल्या १४३ गावांमध्ये लोकसंख्येने मोठ्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये जादा पोलीस बंदोबस्तासह वरिष्ठ यंत्रणेचेही लक्ष असणार आहे.
चौकट
१४३३ पोलीस बंदोबस्तावर
या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ७ पोलीस उपनिरीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ७९ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, ७६४ पोलीस कर्मचारी, ६ स्ट्रायकिंग, २ प्लाटून एसआरपीएफ, ४७९ होमगार्ड, ८६ वाहतूक कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. मतदान केंद्राबाहेर व गावातही पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
चौकट
बिनविरोध गावे
जिल्ह्यातील ९ गावे बिनविरोध झाली आहेत. यात खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, मोघमवाडी, तांदळगाव, भडकेवाडी पात्रेवाडी, नरसेवाडी, कौलगे, लोकरेवाडी या गावांचा समावेश आहे.
कोट
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता मतदारांनी आवश्यक त्या उपाययोजनांसह मतदान करावे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करूनच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
चौकट
अशी आहे निवडणूक
ग्रामपंचायत संख्या १४३
एकूण प्रभाग संख्या ५५१
रिंगणातील उमेदवार ३०७२
महिला उमेदवार १४३१
एकूण मतदार केंद्र ६६२
अधिकारी संख्या ३८४
कर्मचारी संख्या १५१४
चौकट
तालुकानिहाय ग्रामपंचायती
मिरज २२
खानापूर ११
कडेगाव ९
शिराळा २
वाळवा २
आटपाडी ९
तासगाव ३७
पलूस १२
कवठेमहांकाळ १०
जत २९
चौकट
एकूण मतदार ३,४३,८१२
स्त्री १,६८,२२६
पुरुष १,७३,३७३