सांगली : जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. ५) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. सरपंच पदांसाठी २१८, तर सदस्य पदांसाठी एक हजार ५१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामपंचायतीत सत्ता आणण्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ७:३० ते ५:३० या वेळेत जिल्ह्यातील ३६५ मतदान केंद्रांवर एक लाख ८७ हजार ७९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध असून, ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच वगळून उर्वरित ८३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सरपंचपदासाठी ८० आणि एक पोटनिवडणूक अशा ८१ जागांसाठी २१८ उमेदवार, तर सदस्य पदाच्या ६६३ जागांसाठी एक हजार ५१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.५) सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावर कर्मचारी आणि ईव्हीएम मशीन पाठविण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती. निवडणूक असलेल्या गावांमध्ये सायंकाळी कर्मचाऱ्यांसह मतदान यंत्र दाखल झाली.
अकरा ग्रामपंचायती संवदेनशील घोषितमिरज तालुक्यातील हरिपूर, नांद्रे व जानराववाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, मळणगाव, कोकळे, दुधेभावी, ढोलेवाडी व देशिंग, तसेच पलूस तालुक्यातील कुंडल आणि आमणापूर ही अकरा गावे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत.
स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणालाग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्षात प्रचार थांबला असला तरी मतदानासाठी शनिवारी शेवटची रात्र असल्याने कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात. ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून डावपेच आखले आहेत.
येथे काट्याची लढतकुंडल, हरीपूर, नांद्रे, तांबवे, शिरटे, कारंदवाडी, ढालगाव, दुधेभावी, बांबवडे, वाकुर्डे बुद्रुक, नेलकरंजी, साळशिंगे, बिळूर, आमणापूर, मिटकी, करगणी, निंबवडे या ग्रामपंचायतींसाठी काट्याची लढत होत आहे. थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्यामुळे चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम राहणार असल्याचे चित्र आहे.