सांगली : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरही रेंगाळल्याचे चित्र आहे. लिपिक पदासाठी ७ हजारांवर अर्ज दाखल झाले असल्याने या सर्व उमेदवारांचे लक्ष प्रक्रियेकडे लागले आहे.
सांगली जिल्हा बॅँकेत प्रदीर्घ काळ रखडलेली कर्मचारी भरती लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू झाली. एकूण चारशे लिपिक पदांसाठी ही भरती आहे. तांत्रिक व अधिकारी पदांची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली होती. त्यामुळे जूनमध्ये जिल्हा बॅँकेची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन बॅँकेतील सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्याची चिन्हे होती. प्रत्यक्षात जूनमधील पहिला आठवडा संपला असतानाही, अद्याप लेखी परीक्षेबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. यापूर्वी बँकेत विलासराव शिंदे अध्यक्ष असताना २००१ मध्ये सरळ सेवेने कर्मचारी भरती झाली होती. त्यानंतर गेल्या १८ वर्षात बँकेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त झाल्याने सध्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर ताण पडत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये शासनाने सांगली जिल्हा बँकेच्या नवीन १ हजार ४४२ पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी दिली होती.
आकृतिबंधाबरोबरच रिक्त जागा भरण्यासही मान्यता दिली होती. मात्र या जागा भरण्यास विलंब झाला. जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया आॅनलाईन होत आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मार्चमध्ये पार पडली. या कालावधित ७ हजार २४२ अर्ज दाखल झाले आहेत. यातील काही अर्ज अपात्रही ठरले आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने अर्जाच्या प्रक्रियेनंतर नोकरभरती तात्पुरती थांबविण्यात आली. आचारसंहितेच्या काळात परीक्षा न ठेवता ती आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. जिल्ह्यात २३ मे रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर उमेदवारांची आॅनलाईन परीक्षा मेअखेरीस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षात मे महिना संपल्यानंतर आता जूनचा पहिला आठवडाही गेला, तरी लेखी परीक्षेबाबत काहीही सूचना प्रसिद्ध झालेली नाही. अर्ज दाखल करताना उमेदवारांना २ हजार रुपये शुल्क भरण्याचे बंधन होते. त्यातून बॅँकेकडे तब्बल दीड कोटी मिळाले आहेत.उमेदवारांकडून होत : आहे विचारणाबँकेच्या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांकडून लेखी परीक्षेबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया किती दिवसात सुरू होईल, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे.