रवींद्र हिडदुगी ।नेसरी : डोणेवाडी ग्रामस्थांना स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही अजूनही ग्रामस्थांना होडीनेच प्रवास करावा लागतो. मूलभूत सेवा-सुविधापासून वंचित असलेल्या या गावात एस.टी.ची चाके फिरतात ती फक्त निवडणुकांच्या मतपेट्यासाठीच. एस. टी. ची सेवा सुरू व्हावी यासाठी सरपंच उत्तम नाईक यांची धडपड मोठी आहे. एस. टी. गावात केव्हा एकदा येईल, या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.
नेसरी ते डोणेवाडी गावातील अंतर फक्त २ कि. मी. असताना नेसरीस त्यांना हडलगे किंवा सांबरे मार्गे यावे लागते. पूर्वी एस. टी. ला येण्यासाठी योग्य तो रस्ता नसल्याचे कारण होते. मात्र, आता मराठी शाळेपासून सांबरे फाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण झाल्याने गावात एस. टी. येण्यास अडचण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच सर्वच ग्रामस्थांना या एस. टी.चा फायदा होणार आहे.
पं. स. सदस्य विद्याधर गुरबे व सरपंच उत्तम नाईक यांनी एस. टी.च्या प्रश्नाबाबत पत्रकार परिषद घेतली. रस्त्यासाठी आम. सतेज पाटील, उमेश आपटे व मीनाताई जाधव यांनी निधी दिल्याने रस्ता एस.टी.च्या प्रवासासाठी योग्य झाल्याचे सांगितले. आता हा प्रश्न परिवहन खात्याच्या अखत्यारित असून, त्यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या प्रती आस्था दाखविल्यास एस. टी.ची सेवा सुरू होण्यास अडचण नसल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच मारुती फगरे, तानाजी नाईक, मंगल फगरे, अनुसया पाटील, स्वाती सुतार या सदस्यांसह हुसेन जमादार, दिनकर कापसे, आदी उपस्थित होते.‘लोकमत’ने डोणेवाडी गावच्या विविध समस्यांसह एस. टी. बससेवेबाबत वेळोवेळी ग्रामस्थांच्या व्यथा व वेदना मांडल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एस. टी. पोहोचली आहे. मात्र, डोणेवाडी गावच्या नशिबी होडीच आहे; पण एस. टी. सेवा सुरू व्हावी व डोणेवाडीकरांना अच्छे दिन यावेत, यासाठी शासनाने याची नोंद घेणे अपेक्षित आहे.
गावात एस. टी. यावी यासाठी गेल्या २ ते ३ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. परिवहन महामंडळाचे सर्वेक्षणही झाले असून, एस. टी.च्या फेऱ्या सुरू करण्यास अडचण उरलेली नाही. शेतकºयांनीही अतिक्रमणे काढून घेतल्याने रस्ताही रुंद झाला आहे. त्यामुळे गावात एस. टी.ची सेवा सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र, याबाबत महामंडळाने टाळाटाळ केल्यास आंदोलन छेडू. - उत्तम नारायण नाईक, सरपंच डोणेवाडी.