आनंदा सुतारवारणावती : सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्या फिरण्यासाठी येणारे पर्यटक चांदोली (ता. शिराळा) येथे येऊनही या ठिकाणी असणाऱ्या विविध पर्यटनस्थळांना भेटी देत नाहीत. हे पर्यटक चांदोलीत थांबावेत आणि येथील पर्यटनाचा आनंद घ्यावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यटनस्थळाला वर्षातून एकदा निधी दिल्यास या ठिकाणांचा विकास होईल.पायाभूत सुविधांसह चांदोलीचे योग्य मार्केटिंग झाले, तर पर्यटन व्यवसायातून रोजगार संधी निर्माण होतील. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगा, जैवविविधतेने समृद्ध असलेली जंगले, हिरवाईने नटलेले डोंगर, या माध्यमातून निसर्गाने मुक्तपणे दिलेले वरदान तसेच साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, स्मारकांचा समृद्ध वारसा शिराळा व शाहुवाडी तालुक्यांना लाभला आहे. हा वारसा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा यासाठी शासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.चांदोली धरण (वसंत सागर जलाशय), चांदोली राष्ट्रीय अभयारण्य, व व्याघ्र प्रकल्प आणि परिसरातील काही धबधबे एवढीच मोजकी पर्यटनस्थळे पर्यटकांना माहीत आहेत. या व्यतिरिक्त शिराळ्यातील भुईकोट किल्ला, प्रचितगड, गोरक्षनाथ मंदिर, जलविद्युत प्रकल्प, गुढेपाचगणीचे पठार , उखळूचा धबधबा, उदगिरी येथील कालिका मातेचे मंदिर, कांडवण धरण आणि बोटिंग, आणि गडकिल्ल्यांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचली पाहिजे.सुरक्षेच्या दृष्टीने वारणा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीशिवाय ही ठिकाणे पाहता येत नाहीत, मात्र गुढेपाजगणीचे पठार पवनचक्की, या परिसरातील छोटे-मोठे सह्याद्रीचे कडे या ठिकाणासाठी परवानगीची गरज लागत नाही. हे पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगची आवश्यकता आहे. हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शासनाकडून पुढाकार घेणे आवश्यक आहे.
युवकांना गाइड म्हणून तयार करापर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागाने प्रशिक्षित व स्थानिक युवकांना मार्गदर्शक (गाइड) म्हणून तयार करणे गरजेचे आहे चांदोली परिसरातील निसर्ग आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांशिवाय नवनवीन ठिकाणी आणि जुन्या परंपरा अबाधित ठेवून पर्यटन विकास होऊन स्थानिकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. - वसंत पाटील, माजी सरपंच, मणदूर
पर्यटकांना शांत निसर्गरम्य ठिकाणी चांदोली अभयारण्य परिसरात खिशाला परवडणारी हॉटेल उपलब्ध असल्यामुळे लोकांना राहण्याची, घरगुती पद्धतीच्या गावरान नाचणी भाकरी, ज्वारी भाकरी, चुलीवरच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणारी होम स्टे सहज उपलब्ध आहेत. शासनाने यांच्या सुविधेकडे व्यवसाय वाढीसाठी विविध योजना राबवण्याची आवश्यकता आहे. - गणेश माने, हॉटेल व्यवसायिक, मणदूर.