सांगली : गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात लौकिक असलेल्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात एक भाजलेली महिला दोन दिवसांपासून उपचाराच्या प्रतीक्षेत आहे. ४० वर्षीय ही महिला रुग्णालयातील व्हरांड्यात बसून आहे. प्रशासनाने साधी तिची चौकशीही केली नाही. आपल्याला वॉर्डात दाखल करुन औषधोपचार सुरु करतील, या आशेवर ती अश्रू गाळत बसली आहे. रुग्णालयातील औषध विभागाच्या बाकड्यावर ही महिला बसून आहे. तिला तिची आई दोन दिवसांपूर्वी घेऊन आली होती. ती भाजली आहे. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार होत नसल्याचे सांगितले. तिच्या आईने तिला दाखल करुन घेण्याची विनंती केली. पण कोणीच दखल घेतली नाही. शेवटी आईने तिला सोडून घर गाठले. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. भाजलेली ही महिला बाकड्यावरच बसून आहे. तिला जेवण नाही की पाणी नाही. तिला चालताही येत नाही. ती कुठल्या गावची, याचीही रेकॉर्डवर नोंद घेण्यात आलेली नाही.तिची ही अवस्था पाहून रुग्णालयातील कर्मचारी गहिवरले आहेत. अशा रुग्णांची दखल घेण्यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. पण त्यांचेही या महिलेकडे लक्ष गेलेले नाही. परिणामी ती उपचाराविना तशीच बसून आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून ‘ती’ उपचाराच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: August 05, 2016 11:27 PM