सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी सदस्यांना नेत्यांच्या निरोपाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दोन दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल, असे उत्तर नेत्यांकडून मिळाले आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी भाजपचे सदस्य आक्रमक झाले आहेत. गुरुवारची नियोजित बैठक महापालिकेतील गोंधळामुळे रद्द झाली, पण ती दोन दिवसांत घेण्याचे आश्वासन नेतेमंडळींकडून मिळाल्याचे सदस्यांनी सांगितले. गुरुवारी बैठक घेण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते, ती रद्द झाली तरी भाजपचे अनेक सदस्य दिवसभर जिल्हा परिषदेत थांबून होते. नेत्यांबरोबर संपर्कात होते. त्यांच्या हालचालींवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बारकाईने नजर होती. महापालिका पॅटर्न जिल्हा परिषदेतही राबविता येतो काय, याची चाचपणी सुरू होती.
जिल्हा परिषदेचा कार्यकाल वर्षभरच राहिल्याने भाजप सदस्य आर या पार भूमिकेत आहेत. बदल झाला नाही तर प्रसंगी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला जाऊ शकतो. तसे झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीही वाहत्या गंगेत हात धुण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दिवसभर सदस्य नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांना दोन दिवसांत बैठकीचे संकेत देण्यात आले.