सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून वालचंद अॅडमिनिस्ट्रेटीव्ह कौन्सिल व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्या वादाचा गुरुवारी भडका उडाला. या वादात भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी उडी घेतली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय नेत्यांनी ‘एमटीई’कडून नियुक्त संचालक एम. जी. देवमाने यांना हटवून पुन्हा डॉ. जी. व्ही. परिशवाड यांच्याकडे सूत्रे सोपवली. या प्रकाराने महाविद्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला. यावेळी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. वालचंद महाविद्यालयाच्या ताब्यावरून अजित गुलाबचंद अध्यक्ष असलेली नियामक समिती व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटी यांच्यात वाद सुरू आहे. गेली काही वर्षे महाविद्यालयाचे व्यवस्थापन अजित गुलाबचंद यांच्या व्यवस्थापन समितीकडे आहे. गेल्या महिन्यात एमटीईचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, एमटीईचे सचिव श्रीराम कानिटकर व शंभरावर जणांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य व संचालक जी. व्ही. परिशवाड यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी एम. जी. देवमाने यांची संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले होते. नियामक मंडळाचे सदस्य रवी पुरोहित यांनी देशमुख व कानिटकर यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला होता, तर एमटीईने महाविद्यालयाच्या तत्कालीन संचालक मंडळाने गेली चार वर्षे सोसायटीकडे वार्षिक ताळेबंद व आर्थिक अहवाल सादर केला नसल्याचा ठपका ठेवत डॉ. परिशवाड यांना निलंबित केल्याचे सांगितले होते. गेला महिनाभर महाविद्यालयाच्या ताब्यावरून बराच खल रंगला होता. माजी विद्यार्थी व भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘वालचंद बचाओ अभियान’ही हाती घेण्यात आले होते. शासनदरबारीही तक्रारी झाल्या होत्या. गुरुवारी सकाळी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेतली. खासदार पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते व शंभरावर कार्यकर्ते महाविद्यालयात दाखल झाले. त्यात एमटीईचे आणखी एक अध्यक्ष विजय पुसाळकर, रवी पुरोहित, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइंच्या नेतेमंडळींचा समावेश होता. त्यांनी संचालक देवमाने यांचे कार्यालय गाठले. ‘तुमची नियुक्ती बेकायदेशीर झाली असून, तुम्ही खुर्ची खाली करा’, असे त्यांना सांगितले, पण देवमाने यांनी पदभार सोडण्यास नकार दिला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्चीसह बाजूला केले. त्यानंतर महाविद्यालयाची सूत्रे पुन्हा डॉ. परिशवाड यांच्याकडे सुपूूर्द केली. खासदार गटाकडून महाविद्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न होणार असल्याची कुणकुण एमटीईच्या पदाधिकाऱ्यांना लागली होती. त्यांनी सकाळीच महाविद्यालयाच्या आवारात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता, पण पोलिसांनीही या प्रकरणात फारसा हस्तक्षेप केला नाही. यावेळी महापौर हारुण शिकलगार, भाजप नेते दीपकबाबा शिंदे- म्हैसाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, शिवसेनेचे अजिंक्य पाटील, अनिल शेटे, ओंकार शुक्ल, नगरसेवक युवराज बावडेकर, भालचंद्र साठ्ये, गजानन कल्लोळी, माजी नगरसेवक विक्रम पाटील-सावर्डेकर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, श्रीकांत शिंदे, तासगावचे नगराध्यक्ष अविनाश पाटील, रिपाइंचे सुरेश दुधगावकर, मनसेचे दिगंबर जाधव, राष्ट्रवादीचे राहुल पवार, जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, प्रा. आर. बी. शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुंडगिरी कराल तर गाठ माझ्याशी : संजयकाका पाटीलदेवमाने यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाविद्यालयात यापुढे गुंडगिरी कराल, तर गाठ माझ्याशी आहे. पक्षाचा उपयोग करून एक हजार कोटींची मालमत्ता हडप करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप खासदार संजयकाका पाटील यांनी एमटीईचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर केला. खासदारांकडून सुपारी : पृथ्वीराज देशमुख‘वालचंद’चे अजित गुलाबचंद यांची सुपारी घेऊन खासदार संजयकाका पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे. गेली सहा वर्षे हा वाद सुरू आहे. तेव्हा ते कोठे होते? त्यांच्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. त्यांच्याविरोधात धमकीची तक्रार करणार असल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.
‘वालचंद’चा ताबा खासदार गटाकडे!
By admin | Published: June 24, 2016 12:38 AM