बाबासाहेब परीट-बिळाशी---भिंत खचली.. चूल विझली.. होते-नव्हते गेले.. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये अश्रू फक्त राहिले..! छप्पर पेटले.. भिंत खचली.. संसाराची राख झाली.. आधीच नव्हते काही, आता घरही नाही.. अशी स्थिती गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथील जळीतग्रस्तांची झाली आहे. ऐन दिवाळीत संसाराची होळी झाली असताना, त्या सर्व कुटुंबांचे अश्रू पुसण्याचे काम इस्लामपूरचे उद्योजक सर्जेराव यादव यांनी केले.याबाबत माहिती अशी, गुंडगेवाडी येथे दहा घरांना ऐन दिवाळीत आग लागली. सलग घरे असल्याने व आग विझविण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने दहा कुटुंबांचे संसार जळून खाक झाले. शालीन पांडुरंग गुंडगे, मालन किसन गुंडगे, शालन विष्णू गुंडगे यांचे कुंकू आधीच हरवलेले. परिस्थितीशी दोनहात करीत रोजगार करीत त्या दिवसाला दिवस जोडायच्या. नशिबाला दोष देण्यापेक्षा मनगटाच्या साथीने पोट भरणाऱ्या या वृध्दांना नियतीने दुसरा धक्का दिला व त्यांचे आश्रयस्थानही आगीत खाक झाले.याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रातून वाचनात येताच, इस्लामपूर येथील सर्जेराव यादव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव यादव, डॉ. आर. व्ही. कानवडे, डी. वाय. तांदळे यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. तेथील लोकांचे वास्तव हृदय पिळवटून टाकणारे होते. अंगावरचे कपडे आणि शेतातले करपलेले पीक एवढंच फक्त सोबत असणाऱ्या या आया-बहिणींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसण्यासाठी संसारोपयोगी भांडी, अंथरुण, पांघरुण, दिवाळी फराळाचे कीट, प्रत्येक कुटुंबास ३ हजार रुपये मदत देऊन त्यांनी सामाजिक उत्तरदायीत्व दाखवले. एकीकडे शासनस्तरावरील मदतीसाठी सरकारच्या नावे अकांडतांडव करणाऱ्यांच्या डोळ्यात प्रतिष्ठानने अंजन घातले आहे. यावेळी मदत केलेल्यांमध्ये रामचंद्र धनू गुंडगे, शिवाजी तुकाराम गुंडगे, किसन बाळकू गुंडगे यांच्यासह इतर जळीतग्रस्तांचा समावेश आहे.‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत’ या काव्यपंक्तीप्रमाणे देणारे हात समाजात जागोजागी उभे असतात. म्हणून ‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा.’ असे मोडलेले संसार पुन्हा उभे करण्याचे काम सर्जेराव यादव प्रतिष्ठानने केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम..!
भिंत खचली, चूल विझली, होते-नव्हते गेले
By admin | Published: November 19, 2015 11:41 PM