सांगली : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सांगलीत होणाऱ्या शहीद मॅरेथॉन दौडीत सहभागी होण्यासाठी साताºयातील तीन तरुण सातारा ते सांगली असे १३० किलोमीटर धावत आले. अचानक एक भटके श्वान त्यांच्या दौडीत सहभागी झाले. केवळ सहभागच नव्हे, तर १३० किलोमीटरचे अंतर कापत त्या श्वानानेही शहिदांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनच्यावतीने रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी सांगली येथे शहीद मॅरेथॉनचे आठवे पर्व आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तसेच साताºयातील मॅरेथॉनपटू डॉ. संदीप लेले, प्रशांत शेंडगे, पांडुरंग पवार, डॉ आशाराणी जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सातारा ते सांगली अशी दौड आयोजित केली होती. सातारा येथील निरंजन पिसे, मारुती चाळके, पुंडलिक नाईक यांनी १३० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चार तरुणांनी ‘वीर स्मरण व सन्मान’ अशी सातारा ते सांगली दौड केली.
१३० किलोमीटरची ही दौड होती. शनिवारी सायंकाळी ते सांगलीत दाखल झाले, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या एका श्वानाने दौडीत सहभागी तरुणांसह लोकांचेही लक्ष वेधले.शहिदांप्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या या उद्देशाला श्वानाने साथ दिली. संपूर्ण मार्गावर या श्वानाचा दौडीतील सहभाग लोकांचे लक्ष वेधून घेत होता. अनेकांना तो पाळीव श्वान वाटत होता. प्रत्यक्षात ही दौड पूर्ण झाल्यानंतर जेव्हा या मॅरेथॉनपटूंचा सत्कार करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू त्यांच्यासमोर आले, तेव्हा त्यांना हे भटके श्वान असल्याचे समजले.
सांगलीतील विविध खेळाडू, कार्यकर्त्यांकडून श्वानाचे कौतुकसातारा येथील मॅरेथॉनपटूंना भेटण्यासाठी आलेल्या सांगलीतील अनेक लोकांनी श्वानाची कहाणी ऐकल्यानंतर, त्याला कुरवाळत त्याचे कौतुक केले. मॅरेथॉनपटूंनी श्वानासोबत सेल्फी टिपले. आता हे श्वान त्यांच्यासोबतच आहे. सांगलीकरांमध्येही या श्वानाच्या अनोख्या दौडीची व त्याने वाहिलेल्या आदरांजलीची चर्चा सुरू झाली आहे.
- साताऱ्यातील पोवई नाका येथून या दौडीला सुरुवात केली आणि त्यावेळी रस्त्यातून पळत असताना अचानक एक भटके श्वान या मॅरेथॉनपटूंच्या मागे पळू लागले. दौडीत सहभागी तरुणांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला तरीही हे श्वान मॅरेथॉनपटूंचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. पाहता पाहता १०० किलोमीटर अंतर पूर्ण झाले आणि या मॅरेथॉनपटूंना आश्चर्याचा धक्का बसला. ते श्वान न थकता त्यांच्यामागे धावत होते. ते या दौडीत सहभागी झाल्याची जाणीव त्यांना झाली. ऊन, थंडी याची पर्वा न करता या श्वानाने मॅरेथॉनपटूंबरोबर सातारा ते सांगली असे १३० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.