मिरज : आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेले येथील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय अखेर वेल्लोर रुग्णालयाशी संलग्न करण्याचा निर्णय झाला आहे. दिल्ली येथील चर्च ऑफ नाॅर्थ इंडियाकडून तसा निर्णय घेण्यात आला.
तामिळनाडूतील चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या संलग्नतेने यापुढे मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयाचे कामकाज सुरु राहणार आहे. यामुळे रुग्णालयाला पुन्हा चांगले दिवस येण्याची, नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालय कर्मचारी संघटेनेचे प्रतिनिधी व चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या प्रमुखांशी झालेल्या बैठकीत वाॅन्लेस रुग्णालय, वेल्लोर रुग्णालयाशी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाॅन्लेस रुग्णालय कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत या निर्णयाचे स्वागत केले. वेल्लोर येथील सीएमसी रुग्णालय चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या अधिपत्याखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील लाखो रुग्णांना दरवर्षी उपचार देणारे वेल्लोर येथील सीएमसी (ख्रिश्चन मेडिकल कॉलेज) हे रुग्णालय क्षमतेने वॉन्लेसपेक्षा कितीतरी मोठे आहे. शिवाय अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ कार्यरत आहे. त्याचा फायदा वॉन्लेसला मिळणे अपेक्षित आहे.
अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी सुमारे १२५ वर्षापूर्वी मिरजेत सुरु केलेले वाॅन्लेस (मिशन) रुग्णालय आर्थिक अडचणींमुळे गेले वर्षभर बंद आहे. थकीत पगारासाठी कर्मचार्यांचे वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे. खासगी रुग्णालय असल्याने शासनानेही कर्मचार्यांना वार्यावर सोडले आहे. भवितव्याच्या चिंतेने कर्मचारी हतबल झाले आहेत. संभाजी ब्रिगेडने कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन वेतनासाठी पाठपुरावाही केला.
रुग्णालयाचे नियंत्रण करणार्या चर्च ऑफ नाॅर्थ इंडीयाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी मिरजेत बैठक झाली. यावेळी चर्चचे अध्यक्ष बिजाॅय नायक व संचालक उपस्थित होते. नायक यांनी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, कामगार प्रतिनिधी सुधीर वारे, किरण तांदळे, राजू कांबळे, बाळासाहेब पाटील, भास्कर भंडारे, अमीष चंदनशिवे, आशिष कंगनुळकर यांच्यासोबत चर्चा झाली. रुग्णालय पुन्हा सुरु करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर वाॅन्लेस रुग्णालय वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल काॅलेज रुग्णालयाकडे वर्ग करण्याचे ठरले.
... अन्यथा रुग्णालयावर शासनातर्फे प्रशासक
रुग्णालयाचे सध्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बरखास्त करून तीन महिन्यांत वेल्लोर रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. वेल्लोर रुग्णालय आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्याने ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालयाला नवसंजीवनी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत वेल्लोर रुग्णालयाने वाॅन्लेसचा ताबा घेतला नाही, तर रुग्णालयावर प्रशासक नियुक्तीसाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे ब्रिगेडचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. वाॅन्लेस रुग्णालय पुन्हा सुरु होणार असल्याने कर्मचार्यांनी फटाक्यांची आतषबाजी व जोरदार घोषणा देत आनंद व्यक्त केला.