सांगली : महापालिकेच्या रस्ते कामातील बोगसगिरी समोर येत असतानाच, चरी मुजविण्याच्या कामावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. चरीचे काम न करताच ठेकेदारांनी बिले उचलल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या कामाची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत झालेल्या बैठकीत नगरसेवक सुरेश आवटी, प्रशांत पाटील मजलेकर यांनी रस्ते व चरीच्या कामाचा पंचनामा केला. गेल्या दोन वर्षात नव्याने झालेले रस्ते पावसाने वाहून गेले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातच सुरेश आवटी यांनी चरी मुजविण्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली. काही ठिकाणी चरी न मुजविताच बिले उचलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे करण्यात आली आहे. रस्त्यासोबतच चरी मुजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण बांधकामच्या निकषानुसार चरी मुजविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रस्ते व चरी या दोन्ही कामांच्या दर्जाची वालचंद महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) नागरिक : चिखलातून धुळीत! महापालिकेने रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे काम हाती घेतले आहे. प्रमुख रस्त्यावरील खड्डे मुजविताना खडी व मुरूमाचा वापर केला जात आहे. या मुरूमात लाल मातीचा अधिक समावेश असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. कोल्हापूर महापालिका हद्दीत सध्या डांबरी पॅचवर्कचे काम सुरू आहे. मग सांगलीत डांबरी पॅचवर्क का होऊ शकत नाही? यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. पावसामुळे चिखलात रुतलेली सांगली आता पालिकेच्या कृपेने धुळीत माखणार आहे.
सांगलीत चरीवरील लाखोंचा खर्च वाया
By admin | Published: July 18, 2016 12:39 AM