कोकरूड : येळापूर (ता. शिराळा) येथे पारायण सोहळ्यास वारकरी भजनी मंडळ घेऊन आलेल्या युवकाचा कीर्तन सोहळ्यानंतर मंदिराच्या दारातच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५) रात्री १२ वाजता घडली.येळापूर येथे ३१ ऑगस्टपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. दररोज सायंकाळी कीर्तन, भजनी मंडळाचे गायन व आरती असते. मंगळवारी सप्ताहाचा सहावा दिवस होता. मंगळवारी सायंकाळी पाटीलवाडी (ता. कऱ्हाड) येथील तानाजी चव्हाण हा युवक तेथील भजनी मंडळ घेऊन येळापूर येथे आला होता. रात्री नऊ ते अकरा असा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भजनी मंडळाचा गायनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर तानाजी चव्हाण मंदिराच्या बाहेर असणाऱ्या कट्ट्यावर येऊन बसला. अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्यातच त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. जागीच त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यास कोकरूड येथील रुग्णालयात नेले. वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. पाटीलवाडी येथील भजनी मंडळाचा कुठेही कार्यक्रम असला की तानाजी चव्हाण हा गाडीसोबत असायचा. निर्व्यसनी, मनमिळाऊ आणि वारकरी संप्रदायाची गोडी लागलेल्या तानाजीचा भक्तीमय वातावरणात मृत्यू झाल्याने भाविकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. तानाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
सांगलीतील येळापुरात मंदिराच्या दारातच वारकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 12:10 PM