इस्लामपूर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुशांत कुराडे, हृषिकेश पाटील यांनी नायब तहसीलदारांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून जिमखाना, ग्रंथालय, स्नेहसंमेलन यासाठी अतिरिक्त शुल्क घेतल्यास लाक्षणिक आंदोलन करू, असा इशारा तालुका उपाध्यक्ष सुशांत कुराडे, जिल्हा प्रवक्ता हृषिकेश पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
हृषिकेश पाटील म्हणाले, प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घालून महाविद्यालयांची बैठक घ्यावी. या बैठकींना संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलविल्यास विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही मांडू.
यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सदस्य प्रतीक नायकल, धनंजय जाधव, अतुल पाटील, अनिरुद्ध पाटील, अमन मुल्ला, रोषल पाटील, हर्षवर्धन कानडे, हर्षवर्धन मोहिते आदी उपस्थित होते.